नियोजित वेळेपूर्वीच पार पडला उद्घाटन सोहळा..
तथापि, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारासच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी काही काळ चर्चा केली. आणि त्यानंतर सुमारे ६:१५ वाजता त्यांनी कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन केले. राज्याच्या राजकारणात अजित पवार यांची ही वेळेआधी पोहोचण्याची सवय सर्वश्रुत आहे आणि कार्यकर्ते व पदाधिकारी त्यानुसार सज्ज असतात.
खासदार मेधा कुलकर्णींची नाराजी..
भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी या नियोजित वेळेच्या अंदाजे दहा मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. त्यावेळी त्यांना दिसले की उद्घाटन सोहळा होऊन गेला आहे आणि अजित पवार यांचा सत्कार काही अधिकारी व पदाधिकारी करत आहेत. हे पाहून खासदार कुलकर्णी चांगल्याच नाराज झाल्या.
त्यांनी थेट अजित पवार यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की उद्घाटनाची वेळ ६:३० ची होती, परंतु ते वेळेआधीच पार पडले. अजित पवार यांनी आपल्याला मेधा कुलकर्णी येणार असल्याची माहिती नसल्याचे सांगितले. त्यावर खासदार कुलकर्णी म्हणाल्या की, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ही महत्त्वाची बाब असल्याने त्या येणार हे निश्चित होते.
त्यांचा तक्रारीचा सूर वाढत असल्याचे पाहून अजितदादा पवार यांनी सामंजस्याने ‘ताई, चला पुन्हा उद्घाटन करूया’ असे म्हणत पुन्हा कोनशिलेचे अनावरण केले, ज्यामुळे तात्पुरता वाद मिटला असला तरी, या दोन वेळच्या उद्घाटनाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. खासदार कुलकर्णी यांनी नंतर सांगितले की यापूर्वी शिवाजीनगर येथील कार्यक्रमही पवारांनी वेळेआधीच उरकला होता आणि भविष्यात घोषित वेळेचे पालन व्हावे किंवा लवकरची वेळ जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.