पिंपरी (Pclive7.com):- कंपनीवर कारवाई न करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.१४) महापालिका भवनासमोर करण्यात आली.

स्वप्नील मनोहर पाटील (वय ४०) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने एसीबी कडे तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची श्री ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीमधून वायू गळती होऊन वास येत असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडे आली होती. या तक्रारीवरून कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांनी २४ एप्रिल रोजी श्री ट्रेडिंग कंपनीमध्ये स्थळ पाहणी करून पंचनामा केला. पुढील कारवाई न करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली.
एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली. १४ मे रोजी कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयासमोरील रस्त्यावर तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी त्यांना अटक करण्यात आली आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group