पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय प्रकरणी शिक्षा भोगलेल्या कल्याणी देशपांडे हीच गांजा विक्रीचे रॅकेट उध्वस्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी देशपांडे हिचा पती चुलत जावई आणि पुतणीला अटक केली आहे. त्यांच्याकडून २० किलो ७३६ ग्रॅम गांजा सह एकूण ११ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई बावधन येथील पाषाण सुस रस्त्यावरील कल्याणी कलेक्शन या दुकानात केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये कल्याणीचा पती उमेश सुर्यकांत देशपांडे (५६, रा. शिवालय सोसायटी, पल्लवी अपार्टमेंट, पाषाण), चुलत जावई अभिषेक विकास रानवडे (३२, सध्या रा. बालाजी निवास, पाषाण, मूळ रा. दुधाळवाडा, शनिवार पेठ) आणि पुतणी ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे (२२, रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा समावेश आहे.
उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी देशपांडे हीने गांजा विक्री सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून तिघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून २० किलो ७३६ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल आणि रोख ७०० रुपये असा एकूण ११ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशावरून, सह-आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, गणेश कर्पे, किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, कपिलेश इगवे, चंद्रकांत जाधव यांनी ही कारवाई केली.