पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांचे हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल शोधून परत देण्याच्या विशेष मोहिमेमध्ये वाकड पोलिसांनी मोठी कामगिरी केली. तब्बल ४० लाख रुपये किमतीचे १३७ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून हस्तगत करून मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत. आपले मोबाइल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड़ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहाळ झालेले अथवा चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्याच्या या मोहिमेसाठी वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शहाजी धायगुडे व प्रिया पवार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने सीईआयआर पोर्टलच्या मदतीने मोबाईल ट्रेसिंग सुरू केली. त्यानुसार गहाळ मोबाईलचे लोकेशन पिंपरी चिंचवड, पुणे परिसर, तसेच बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणी सापडले. मोबाईल ज्या व्यक्तीकडे सापडले, त्यांच्याशी थेट संपर्क साधून मोबाईल परत करण्याबाबत विनंती करण्यात आली. अनेकांनी मोबाइल स्वतः येऊन दिले, तर काहींनी कुरिअरद्वारे पाठवले. काही जण परत करण्यास टाळाटाळ करत असल्यास, पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून प्रत्यक्ष जाऊन मोबाईल हस्तगत केले. याआधी डिसेंबर २०२४ मध्येही वाकड पोलिसांनी २० लाख रुपयांचे २५७ मोबाईल नागरिकांना परत केले होते.
सदरची कामगिरी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस अंमलदार शहाजी धायगुडे व प्रिया पवार यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group