भोसरी (Pclive7.com):- दिघी येथील गुरु ग्लोबल किड्स या शाळेचा पहिला दिवस आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या पहिल्या दिवसाची विशेष थीम होती “एक मूल, एक झाड – Save Nature, Save Future”.

या सुंदर उपक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध यूट्यूबर निकिता शिंगुस्ते मॅडम उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत मुख्याध्यापिका उषा मेसरे आणि उपमुख्याध्यापिका प्रतिभा मोहने यांनी केले. त्यांची उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

थीमनुसार, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाला एक झाड भेट देण्यात आलं, जे त्यांनी आपल्या मुलासोबत लावून संगोपन करावं, असा संदेश देण्यात आला. यामागील उद्दिष्ट होतं भविष्यात आपल्या मुलांना शुद्ध हवा मिळावी, त्यांना निसर्गाच्या आपत्तींना सामोरं जावं लागू नये. आणि त्यांचं जीवन पर्यावरणपूरक घडावं.

भविष्यामध्ये आपल्या मुलांना ऑक्सिजनची कमी पडू नये, किंवा विकत घेण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी आतापासूनच आपण पर्यावरणाचे संरक्षण केलं पाहिजे. पर्यावरणाला हानी पोहोचेल असे कुठलेच काम आपण करतात कामा नये आणि दरवर्षी एक तरी झाड आपल्या मुलाच्या हाताने आपण लावून घेतले पाहिजे, असा संदेश मुख्याध्यापिका उषा मेसरे मॅडमनी दिला. शाळेच्या वतीने सर्व पालक, विद्यार्थी आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
