पिंपरी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवलं आहे. आळंदीतील संजीवन समाधी मंदिराजवळील माऊलींच्या आजोळ घरी झालेल्या पारंपरिक मुक्कामानंतर अभंगवाणीत रंगलेल्या वातावरणात माऊलींच्या पालखीने पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवलं आहे.

काल दि.१९ जून रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा करून पालखीने महाद्वारातून बाहेर पडत भरावरस्ता, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती, चावडी चौक, महाद्वार चौक असा मार्ग घेत ‘दर्शन मंडप’ अर्थात ‘आजोळ घरी’ मुक्काम केला.

आज सकाळी दि.२० जून रोजी पावणे सातच्या सुमारास माऊलींच्या अश्वांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर खांद्यावर खांद्यावर पालखी पालिका चौकापर्यंत आणण्यात आली. सव्वा सातच्या सुमारास रथात विराजमान झालेल्या पालखीने माऊली माऊलींच्या गगनभेदी जयघोषात पुण्यनगरीकडे प्रस्थान केले.