खेड (Pclive7.com):- वाकी बुद्रुक ता.खेड येथून वाकी बुद्रुक ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर गारगोटे शिवार ते भैरवनाथ मंदिर संतोषनगर येथून या पायी दिंडीचे प्रस्थान झाले. दुपारी प्रमोद बाळासाहेब कड यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यानंतर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम… असा जयघोष करत दिंडीला सुरुवात झाली.

सकाळी ११ वाजता विणा, तुळशी वृंदावन, कलशाचे पूजन करून वारकरी सांप्रदयाचे प्रतिक असलेल्या भगवी पताका वारकऱ्यांनी खांद्यावर घेऊन शेकडो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा जय घोषाने ठेक्यात नाचत होते. यावेळी गावामध्ये भक्तिमय वातावरण झाले होते.

पायी दिंडीत विठुनामाचा गजर करीत वारकरी चालत असतात. यामध्ये त्यांना ऊन, वारा, पाऊस याची कसलीही पर्वा नसते. सारा भार विठ्ठलावर ठेवून अगदी आनंदाने हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने रोज ठराविक अंतर मार्गस्थ होतात. पंढरपूरच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये एक वेगळाच अनुभव आणि आनंद मिळतो असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच अलीकडे गावागावातून पायी दिंड्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.