मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा, दुधाचा अभिषेक
आज आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. दरम्यान, महिनाभर वारी करत चालत असणारे वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले आहेत. मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे असलेले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना विठूरायाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना- मुख्यमंत्री
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
























Join Our Whatsapp Group