पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पवना धरणात सध्या ७४.६४ टक्के एवढा पाणीसाठा असून धरणातून आज (दि.०६) सकाळी ८ वाजल्यापासून ८०० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने म्हटले आहे की, पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७४.६४ टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने ४०० क्युसेक्स मुक्त विसर्ग करण्यात येत होता. तरी, आज (दि.०६) सकाळी ८ वाजल्यापासून पाणलोट क्षेत्रातील येव्यानुसार सांडव्यावरील विसर्गामध्ये वाढ होऊन एकुण विसर्ग ८०० क्युसेक्स इतका राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group