हिंजवडी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा केला. यावेळी अनेक कामांच्या त्रुटी पाहता हिंजवडीच्या सरपंचासह अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. दरम्यान अद्यापही या कामांच्या मध्ये काही जण येत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी पवारांकडे करताच कामामध्ये आडवे येणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश दिले.

दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी पवार यांनी सुरू केली आहे. देण्यात आलेल्या आदेशानंतर प्रशासन कामाला लागले आहे. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. दरम्यान, आज पाहणी करताना अनेक गोष्टी पवारांच्या निर्दशनास आल्या. यावेळी काही अधिकाऱ्यांनी कामांच्या मध्ये काही जण आडवे येत असल्याची तक्रार केली. तर हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर कामात मंदिर जात असल्याबाबतची समस्या मांडली. यावेळी पवार भलचे संतापले.

‘आपलं वाटोळं झालं..
धरण बांधताना मंदिर जातातच ना. आपलं वाटोळं झालं आहे. आपली हिंजवडीची आयटी पार्क माझ्या पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर बंगळुरु, हैद्राबादला चाललंय. तुम्हाला काही पडलं नाहीय. मी का सकाळी सहा वाजता इथे येऊन बघतोयच त्यामुळेच बघतोयना.

कोणीही मध्ये आलं तर त्यावर ३५३ टाका
यावेळी पवारांनी मेट्रोच्या कामासोबत इतर समस्यांची पाहणी केली. रस्ते वाहतून कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. “आपलं असं ठरलंय कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर ३५३ दाखल करा. तो कोणीही असेल तरी करा. अजित पवार जरी मध्ये आला तरी ३५३ दाखल करायचा. बाकीचं कोणाचं काय ठेवायचंच नाही. ३५३ लावायचा कारण त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. नाही प्रत्येक जण माझं हे करा माझं ते करा असं करत राहिलं, आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे”, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश
काही दिवसांपूर्वी पवार यांनी हिंजवडीमधील समस्यांचा आढावा घेत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी सूचना करताना हिंजवडी परिसराचे सर्वेक्षण करुन अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच यावेळी त्यांनी कामे वेगाने करण्याचे निर्देशदेखील दिले होते.






















Join Our Whatsapp Group