पिंपरी (Pclive7.com):- शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २० टक्के जादा परतावा देण्याच्या आमिषाने महिलेची ५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने मध्य प्रदेश, दिल्ली येथून पाच जणांना अटक केली.

या प्रकरणी पूनम मांगीलाल जैन (४२, रा. इंदौर, मध्यप्रदेश), गणेश पूनमचंद ढोले (२८, रा. मध्य प्रदेश), रॉकी उर्फ राजेश जयप्रकाश कुशवाह (२८, रा. दिल्ली), प्रदीपकुमार मदनलाल कुमार केन (३०, रा. दिल्ली) आणि हर्षित ओमप्रकाश घोटन (२८, रा. दिल्ली) या सर्वांना अटक केली आहे. संबंधित महिलेने एका शेअर मार्केट जाहिरातच्या लिंकवर भेट दिली होती. त्यात गुंतवणुकीवर ५ ते २० टक्क्यांचा परतावा मिळेल असे भासविले होते. त्यानंतर संबंधितांनी फिर्यादी महिलेला एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. तसेच, त्यात ५४ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. काही दिवसात त्या ॲपवर २ कोटी ५२ लाखांचा नफा दिसला. ते पैसे काढण्यासाठी महिलेस वेगवेगळे चार्जेस भरावे लागतील असे सांगितले. महिलेस शंका आल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, तपास करत पोलिसांनी मध्य प्रदेश, दिल्लीतून आरोपींना अटक केली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमन, प्रकाश कातकाडे, रोहीत डोळस, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, पोलीस अंमलदार दिपक माने, दिपक भोसले, सुभाष पाटील, विनायक म्हसकर, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, अभिजित उकिरडे, सुरज शिंदे, अनिकेत टेमगिरे, माधव आरोटे, स्वप्निल खणसे, सोपान बोधवड, दिपाली चव्हाण, भाविका प्रधान, मोनिका चित्तेवार, स्मिता पाटील, सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group