पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड तसेच थेरगाव परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनिकेत प्रभु, तुषार वराडे, शंतनु तेलंग, यश कुदळे यांनी महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. याप्रसंगी मनसेच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक कुत्रा भेट देण्यात आला.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक महिन्यांपासून चिंचवडगाव येथील केशवनगर, तालेरानगर, काकडे पार्क व चिंचवड गावठाण तसेच थेरगाव येथील डांगे चौक, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, दत्तनगर या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कुत्र्यांचा मुक्त वावर पादचाऱ्यांसाठी, महिला व जेष्ठ नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत असून, लहान मुलांवर व वृद्धांवर ते वारंवार धाव घेतात. काही वेळा चावा घेण्याचे प्रकारही घडले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेसही कुत्री एकत्र येऊन जोरजोराने भुंकतात, त्यामुळे नागरिकांची झोपमोड होते, लहान मुले घाबरतात आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

काही भागात सेकंड व नाईट शिफ्टला जाणाऱ्या कामगारांच्या वाहनांच्या मागे धाव घेत हे कुत्रे त्यांना चावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कामगार घाबरून वाहने वेगात चालवतात व त्यातून अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. या अगोदर अशा परिस्थितीमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत.

याबाबत वारंवार तक्रारी करुन सुध्दा पशुवैद्यकीय विभाग काहीच कारवाई करत नाही, अनेक नागरीकांनी सारथीवरही तक्रारी दिल्या आहेत, त्यांही तक्रारी महापालिकेडुन कोणतीही करवाई न करता बंद करण्यात येत आहेत. सदर घटननेबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत पशुवैद्यकिय अधिकारी अरुण दगडे यांना प्रतिकात्मक कुत्रे भेट देण्यात आले. तसेच या गंभीर प्रकरणाकडे वैयक्तिक लक्ष देऊन संबंधित विभागाला त्वरित योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा यावेळी प्रतिकात्मक कुत्रे दिले आहे पुढील वेळी खरी कुत्री पकडुन पशुवैद्यकिय विभागात सोडण्यात येतील, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group