पिंपरी (Pclive7.com):- मुसळधार पावसामुळे पवना नदीपात्रात प्रचंड वाढ झाली आहे. पिंपरीत प्रभाग क्र. 21 मधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे ऑन फिल्ड उतरले आहेत.

पवना धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून सुमारे १५,००० क्युसेस पाण्याचा निसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २१ मधील नदीलगतच्या भागांमध्ये पूरस्थितीचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ चे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने ग क्षत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किशोर ननावरे, तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत संजय गांधी नगर, सुभाष नगर, मिलिंद नगर, आंबेडकर कॉलनी या भागांना प्रत्यक्ष भेट देण्यात आली.

नदीपात्रालगत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कमला नेहरू शाळा, हिंदी सिंधी शाळा, वाल्मीक आश्रम, तसेच डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय या ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
नागरिकांच्या गरजांचा विचार करून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा — निवारा, पाणी, अन्न, औषधे व इतर तातडीच्या सेवा — त्वरीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नागरिकांना धीर देत त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासन, पोलिस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.






















Join Our Whatsapp Group