पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील २२७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सहायक आयुक्त, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, कार्यकारी अभियंता यासह विविध पदांचा समावेश आहे.

महापालिकेतील नगरसेवकांचा १२ मार्च २०२२ ला कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे मागील साडेतीन वर्षांपासून आयुक्त हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. महापालिका पदोन्नती समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढत्या देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.

अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, कालावधी, सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य माहिती अधिकारी १, सहायक आयुक्त ४, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १, प्रशासन अधिकारी ६, उपअभियंता (स्थापत्य) ३०, असिस्टट मेट्रन ३, कार्यालय अधीक्षक ८, मुख्य लिपिक ७२, उपलेखापाल २५, लिपिक ६२, वीजतंत्री ३, कनिष्ठ अभियंता ४, आरोग्य निरीक्षक १, सिस्टर इनचार्ज ३, नाईक ४ अशा २२७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.

महापालिकेत नगरसेवक असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी विधी समिती, सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतरच पदोन्नती मिळते. यामध्ये बराच कालावधी जातो. काही वेळा सभा तहकूब होतात. अनेक वेळा तर अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागतात. त्यानंतर पदोन्नती मिळते. मात्र, प्रशासकीय राजवटीत जलद गतीने अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील साडेतीन वर्षात पाचशेपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.























Join Our Whatsapp Group