पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला गेल्या वर्षभरापासून मंत्रीपदाचे वेध लागलेत. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळेल अशी चिन्हे निर्माण झालीत. दरम्यान या दोघांपैकी मंत्रीपद कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला असताना राज्यस्तरीय लेखा समितीच्या अध्यक्षपदी शहरातील अॅड. सचिन पटवर्धन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. हे पद राज्यमंत्री दर्जाचे असून याला विशेष महत्व देखील आहे. पटवर्धन यांच्या या निवडीमुळे आता शहराच्या पदरात आणखी काही मिळू शकेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यातील सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर बारीक नजर ठेवण्याची जबाबदारी असणार्या राज्यस्तरीय लेखा समितीच्या अध्यक्षपदी चिंचवडच्या अॅड. सचिन पटवर्धन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. हे पद राज्यमंत्री दर्जाचे असून राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मार्च २०१५ मध्ये पिंपरी चिंचवड शहराला प्रथमच मंत्री दर्जाचं हे पद मिळालं होतं. अॅड. पटवर्धन यांच्या नियुक्तीने पिंपरी चिंचवड भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पटवर्धन यांची शहरपातळीवर या पदाच्या माध्यमातून स्वत:ची विशेष अशी छाप पडलेली दिसत नाही. तरी देखील पक्षाने त्यांच्यावर मेहरनजर दाखवत या पदी पुन्हा संधी दिलीय.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर कोणत्याही महामंडळाचे अथवा राज्यस्तरीय समितीचे अध्यक्षपद मिळवून राज्यमंत्री दर्जाचे पद मिळविणारे अॅड. पटवर्धन हे पिंपरी चिंचवडमधीलच नव्हे तर राज्यातील पहिलेच पदाधिकारी ठरले होते. सध्या राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. महापालिकेत पहिल्यांचाच भाजपची सत्ता मिळवून देणारे लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा समावेश त्यात होण्याची शक्यता आहे. तशी चर्चा शहरपातळीवर सुरू आहे. दरम्यान हे दोघेही कारभारी कोणाची वर्णी लागणार या प्रतिक्षेत असताना अॅड. सचिन पटवर्धन यांची नियुक्ती या स्थानिक नेत्यांना धक्का देणारी मानली जात आहे. त्यांच्या नियुक्तीने शहरातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.