पिंपरी (Pclive7.com):- पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका १७ वर्षीय तरूणाला मारहाण करून त्याचे आणि त्याच्या मित्राचे मोबाईल व मोटारसायकल चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि.१० सप्टेंबर) दुपारी अंकुश चौक, ओटा स्कीम निगडी येथे घडली.

याप्रकरणी १७ वर्षीय मुलाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश आकाश खंडाळे (२३), हेमंत आकाश खंडाळे (२५), सोहेल संतोष जाधव (२०) आणि ऋषी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल जाधव याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलाने आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला लोखंडी फायटर आणि कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केली. तसेच, सर्व आरोपींनी मिळून त्याला व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यांनी पीडित मुलाचा मोबाईल, स्लेंडर मोटारसायकल आणि त्याच्या मित्राचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. शस्त्रे दाखवून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group