
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या मोशी येथील ७००-बेड्सच्या जनरल हॉस्पिटलचे काम प्रगतीपथावर आहे. या हॉस्पिटलचे जवळपास ५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. नुकतीच आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित प्रकल्प गुणवत्ता मानके पाळून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, अनिल भालसाखळे सह शहर अभियंता विद्युत, कार्यकारी अभियंता विजय भोजने यांच्यासह नगररचना, विद्युत अशा विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाले असून ते पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत आहे. दिलेल्या मुदतीत प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मोशी जनरल हॉस्पिटलचा प्रकल्प १५ एकर जागेत उभारण्यात येत असून त्यासाठी ३४० कोटी ६७ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. हा प्रकल्प तळमजल्यासह ८-मजली एकात्मिक वैद्यकीय कॅम्पस म्हणून डिझाइन केला गेला असून एकूण बांधकाम क्षेत्र ५७,४५० चौरस मीटर आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहर व परिसरातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य सुविधा प्रकल्पांपैकी एक बनेल. या प्रकल्पामध्ये नियोजित असणाऱ्या सुविधांमध्ये आपत्कालीन आणि ट्रॉमा केअर, सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा, रेडियोलॉजी आणि डायग्नोस्टिक्स, सायकायट्री, बालरोग, प्रसूती व स्त्रीरोग, इंटेन्सिव्ह केअर युनिट्स, डायालिसिस सेंटर, मॉड्युलर ऑपरेशन थियेटर्स आणि वॉर्ड्स यांचा समावेश आहे. आठव्या मजल्यावर कर्मचारी निवास, वसतिगृह , व्याख्यान सभागृह आणि उपहारगृह असतील.

या प्रकल्पासाठी ईडीजीई (EDGE) व आयजीबीसी (IGBC) गोल्ड प्रमाणपत्र मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने हरित उपाययोजनांचा भाग म्हणून येथे २०० किलोवॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर पॅनेल, २०० केएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, सेन्सरयुक्त ऊर्जा कार्यक्षम एलईडी लाईटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कमी प्रवाहाचे जल उपकरणे आणि सेंद्रिय कचरा उपचार प्रकल्प यांचा समावेश आहे. महापालिकेने अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टिने विविध उपाययोजना देखील केल्या आहेत. यामध्ये फायर कर्टन, CO₂ सेन्सर्स, स्ट्रेचर-अनुकूल रॅम्प्स आणि प्री-एक्शन फायर सिस्टम्स यांचा समावेश आहे. बेसमेंटमध्ये २७४ चार चाकी वाहनांसाठी आणि २५० दुचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा असेल.

याशिवाय भविष्यात मोशी कॅम्पस संपूर्ण आरोग्य सेवा व शिक्षण केंद्र म्हणून नियोजित आहे, ज्यामध्ये २००-बेड्सचे ऑन्कोलॉजी हॉस्पिटल, १५० विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्मचार्यांसाठी निवासीय क्वार्टरची व्यवस्था असेल.

मोशी जनरल हॉस्पिटल हा वैद्यकीय सेवा क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाचे काम आता अर्ध्या टप्प्यावर आहे, त्यामुळे आमचा उद्देश हा गती टिकवणे आणि नागरिकांना नियोजित वेळापत्रकात आधुनिक, टिकाऊ आणि जागतिक दर्जाचे हॉस्पिटल मिळवून देणे आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

मोशी जनरल हॉस्पिटल प्रकल्पाचे कामाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. या कामाची गती वाढली असून सुरक्षितता किंवा गुणवत्तेबाबत तडजोड न करता प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पिंपरी चिंचवड शहराच्या उत्तरेकडील भागातील नागरिकांसाठी हा प्रकल्प खूपच महत्त्वपूर्ण ठरेल.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

मोशी जनरल हॉस्पिटलचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य दर्जेदार असून सातत्याने त्याची गुणवत्ता तपासली जात आहे.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका






















Join Our Whatsapp Group