
पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील विमल गार्डन येथे रविवार (दि.२८) रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत सोळा कुलस्वामिनी तसेच कानुबाई मातेच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाने या उत्सवाचे आयोजन केले आहे.

चैतन्य आणि मांगल्याचा बहर घेऊन शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे. प्रत्येक घरात कुलस्वामिनी, कानुबाई माता तसेच सर्व देवींची आराधना होत आहे. कुलस्वामिनींच्या अधिष्ठानातून समाजाच्या प्रगतीला यशाचे आणि समृद्धीचे वरदान लाभते ही सर्वांची धारण आहे. याच विचारधारेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रहाटणी येथील विमल गार्डन या ठिकाणी या उत्सवाचे उद्या रविवार (दि.२८) रोजी आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवाला कैलास (बापू) वाणी (अध्यक्ष राष्ट्रीय महाअधिवेशन वाणी समाज), राजेंद्र पाचपुते (प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र वाणी युवा मंच) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अमित गोरखे, उमा खापरे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

रविवारी सायंकाळी ७ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत कानुबाई मातेच्या गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याप्रसंगी महिलांसाठी विशेष रास दांडिया व गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित ११ भाग्यवान महिलांना आकर्षक पैठणी भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी कानुबाई मातेचे दर्शन व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज ब्राह्मणकर यांनी जास्तीत जास्त समाजातील बंधू-भगिनींनी या उत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.


























Join Our Whatsapp Group