

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचे नाव पुणे मेट्रो या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून त्याचे नामकरण “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मारूती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये मेट्रो कॉर्पोरेशनची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असूनही प्रकल्पाचे नाव फक्त पुणे मेट्रो ठेवण्यात आले आहे. यात पिंपरी चिंचवडचा अन्यायकारक पद्धतीने उल्लेख टाळला आहे. त्यामुळे तातडीने नावामध्ये बदल करून पिंपरी चिंचवडचा सन्मान राखावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच पिंपरी ते निगडी या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांचे अपघात होत आहेत. उपचारावर लाखो रुपये खर्च होत असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, असा आरोप मारूती भापकर यांनी केला आहे.

या गंभीर विषयावर त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि मेट्रो कॉर्पोरेशनचे अधिकारी श्रावण हर्डीकर यांना वारंवार पत्रव्यवहार केला असून, महापालिका व मेट्रो प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ होतो आहे. याबाबत तातडीने लक्ष घालून योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.























Join Our Whatsapp Group