
पिंपरी (Pclive7.com):- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ८ ते २५ टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची ६३ लाख ९३ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या बँक खात्यावरून एक कोटी १५ लाख रुपयांचा व्यवहार झाला असून, त्याबाबत विविध राज्यातून १० तक्रारी दाखल आहेत.

प्रथमेश शिवाजी भुसे (२३, रा. लोहगाव, पुणे. मूळ रा. अहिल्यानगर), सचिन राधाकिसन मोरे (३४, रा. दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची १० जुलै ते ५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ६३ लाख ९३ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याबाबत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात २५ ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता. फेसबुक पाहत असताना तक्रारदार व्यक्तीला एक जाहिरात दिसली. त्यानंतर वेगवेगळ्या लिंकद्वारे शेअर खरेदी करण्यास सांगत फसवणूक केली. दरम्यान, तक्रारदार व्यक्तीला त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर सात कोटी ५६ लाख ९१ हजार ४६० रुपये नफा झाल्याचे दाखवले.

तक्रारदाराने पैसे पाठवलेल्या बँक खात्याची माहिती सायबर पोलिसांनी काढली. संबंधित बँक खाते मातोश्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी या नावाने असून, त्याची केवायसी प्रथमेश भुसे याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी प्रथमेशला ताब्यात घेतले. साथीदार सचिन मोरे याच्या सोबत मिळून हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सचिन मोरे यालाही ताब्यात घेतले. संशयितांनी तक्रारदाराकडून पैसे घेतल्यानंतर ते बँकेतून रोख स्वरूपात काढून त्याची विल्हेवाट लावली. संशयितांनी वापरलेल्या बँक खात्यावर एक कोटी १५ लाख ८५ हजार ७८९ रुपयांचा व्यवहार झाला आहे.

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलिस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हस्कर, हेमंत खरात, कृष्ण गवळी, श्रीकांत कबुले, अभिजीत उकिरडे, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, संतोष सपकाळ, दीपाली चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group