
चिखली (Pclive7.com):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू होत असून, देशभर तसेच परदेशातही विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर चिखली नगरामध्ये दिनांक २८ सप्टेंबर रोजी संघाचे पथसंचलन आणि विजयादशमी उत्सव उत्साहात पार पडला.

यावेळी गणवेशधारी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर नागरिकांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती. शतकपूर्ती वर्षानिमित्त संघाने जाहीर केलेले पंचपरिवर्तनाचे बिंदू — स्वबोध, कुटुंब प्रबोधन, समरसता, नागरी शिष्टाचार आणि पर्यावरण संरक्षण — समाजापर्यंत पोहोचवण्याच्या निर्धाराचा ठसा या उत्सवात उमटला.

उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपजी तिलवाणी (अकॅडमी हाइट्स पब्लिक स्कूल, चिखली) उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून बाळासाहेब लोहकरे (पुणे विभाग कार्यकारिणी सदस्य) यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. उत्सवाच्या सुरुवातीलाच नगराचे कार्यवाह, प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्त्यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले.

आपल्या मनोगतात प्रमुख पाहुण्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा देत संघ सामाजिक कार्यात कसा अग्रस्थानी आहे यावर प्रकाश टाकला व पुढील काळामध्ये आपणही सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत राहू असे उद्गार काढले. प्रमुख वक्त्यांनी संघाची स्थापना, उद्दिष्टे, संघाचा विविध आंदोलनांतील सहभाग तसेच सेवा कार्याची परंपरा यांचा संदर्भ देत पंचपरिवर्तनाच्या बिंदूंवर विशेष भर दिला. आणि सर्व समाजाला संघाच्या या पंच परिवर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कळकळीचे आवाहन केले.

शिस्तबद्ध पथसंचलन, प्रेरणादायी बौद्धिक आणि उत्साहपूर्ण सहभाग यामुळे चिखली नगरातील हा विजयादशमी उत्सव शताब्दी वर्षाला साजेसा ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिखलीनगराचे कार्यवाह किशोरजी माने यांनी केले, आभार प्रदर्शन चिरंतनजी कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन तुषारजी चौधरी यांनी केले.























Join Our Whatsapp Group