पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचार, लाचखोरीचे आरोप तसेच महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विनोद नढे यांनी म्हटले आहे की, निवडणूक विभागात ‘अनुरेखक’ पदावर कार्यरत असलेला दिलीप आडे हा कर्मचारी यापूर्वीही गंभीर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकला होता. पाणीपुरवठा विभागात कार्यरत असताना निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई झाली होती. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले होते.

संबंधित कर्मचाऱ्याची नंतर निवडणूक विभागात आणि त्यानंतर जनगणना विभागाच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, जनगणनेच्या कामादरम्यान एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर झाला असून निगडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनासाठी ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करावे, त्याच्या संपूर्ण सेवाकाळातील कामकाजाची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी विनोद नढे यांनी केली आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासनाने त्वरित आणि कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा महिलांच्या न्यायासाठी आणि जनहितासाठी महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विनोद नढे यांनी दिला आहे.




















Join Our Whatsapp Group