पिंपरी (Pclive7.com):- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नाशिक फाटा ब्रिजजवळ भीषण अपघात घडला. शिवाई इलेक्ट्रिक बसने समोरून जात असलेल्या दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेत एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या बसने अचानक नियंत्रण गमावल्याने समोरील दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमी दुचाकीस्वाराला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती निरीक्षणाखाली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या अपघातामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.




















Join Our Whatsapp Group