वाकड (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाकड येथील सिल्वर स्कायस्केप्स सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी परिसरातील नागरिकांसमवेत उत्स्फूर्त सहभाग घेत योग, प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

या योग सत्रात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात नियमित योगाभ्यासाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

यावेळी बोलताना नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी सांगितले की, भारताच्या प्राचीन योग परंपरेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर नवी ओळख आणि मान्यता मिळाली आहे. त्याच प्रेरणेतून यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन “१२ वर्षे जनसेवेची, जनकल्याणाची” या संकल्पनेसह उत्साहात साजरा करण्यात आला.

योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनाचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. नियमित योगाभ्यासामुळे आरोग्यदायी जीवनशैली निर्माण होऊन सकारात्मक विचारसरणीला चालना मिळते, असा संदेशही त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांना नियमित योग करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. “दररोज योग – निरोगी आणि आनंदी जीवनाचा मंत्र!” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




















Join Our Whatsapp Group