चिंचवड (Pclive7.com):- आमदार विकास निधी अंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये केशवनगर येथे उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे लोकार्पण करण्यात आले असून, विविध भागांतील पायाभूत सुविधांच्या कामांनाही प्रारंभ करण्यात आला.

केशवनगर, चिंचवड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टामुळे परिसरातील युवक व खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होणार असून क्रीडा क्षेत्राला चालना मिळणार आहे. यावेळी नगरसेविका अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, विनोद नढे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, मधुकर बच्चे, स्थानिक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच एम.बी. कॅम्प झोपडपट्टी, किवळे येथील दलितवस्ती परिसरात महिलांसाठी शौचालय बांधकाम तसेच मरिमाता मंदिर परिसराच्या काँक्रीटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमुळे परिसरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

लोंढेनगर, चिंचवड येथे काळूबाई मंदिर परिसर विकास कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय वेताळनगर झोपडपट्टी दलितवस्ती परिसरातील मोरया नगर सोसायटी बिल्डिंग क्रमांक २ येथे ड्रेनेज लाईनची कामे, ओपन जिम मैदानालगत संरक्षक भिंत बांधणे आणि अण्णाभाऊ साठे अभ्यासिका उभारणे या महत्त्वपूर्ण विकासकामांचेही भूमिपूजन करण्यात आले.

रावेत येथील हिल टॉप सोसायटी परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या चावडीच्या बांधकामालाही प्रारंभ करण्यात आला. या चावडीमुळे ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सुसज्ज जागा उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन हाती घेतलेली ही विकासकामे परिसरातील पायाभूत सुविधा बळकट करून सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, पदाधिकारी आदी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group