पिंपरी (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री गजानन बाल संस्कार केंद्राच्या वतीने घोराडेश्वर डोंगरावर सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निसर्गरम्य वातावरणात आणि डोंगरमाथ्यावरील प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाला पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध योग मार्गदर्शक विश्वास सोनोवणे यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री गजानन बाल संस्कार केंद्राचे संस्थापक मंगेश पाटील यांनी केले होते. डोंगरमाथ्यावरील स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात लहान मुलांसह पालकांनी मोठ्या उत्साहाने योगाभ्यास केला. सहभागींच्या शिस्तबद्ध उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून योगाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्री गजानन बाल संस्कार केंद्राच्या या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group