वाकड (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राम हनुमंत वाकडकर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्या तथा नगरसेविका सौ. श्रुती राम वाकडकर यांच्या वतीने वाकड येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मॅचडे अरेना, दत्त मंदिर रोड, वाकड येथील सौ. श्रुतीताई रामभाऊ वाकडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामागील मैदानावर सकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती तसेच मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

यावेळी बोलताना राम हनुमंत वाकडकर यांनी सांगितले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा हा जीवनमार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला असून आज जगातील १९० हून अधिक देश योग दिन साजरा करत आहेत. निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र उभारण्यासाठी योगाचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या सौ. श्रुती राम वाकडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. योग ही केवळ काही आसनांची मालिका नसून निरोगी, आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याची पद्धत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले. वाकड परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून निरोगी समाज घडविण्याबाबत नागरिकांची जागरूकता आणि बांधिलकी दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे, योग प्रशिक्षकांचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. “निरोगी कुटुंब, निरोगी समाज आणि विकसित भारतासाठी दररोज योग करूया”, असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.




















Join Our Whatsapp Group