
पिंपरी (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिराशेजारील देऊळमळा मैदान येथे आयोजित सामूहिक योग साधना कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोहम योग साधना, पवना ग्रुप आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ४५० योगसाधकांनी सहभाग घेत विविध योगासने आणि प्राणायामांचे सादरीकरण केले.

या कार्यक्रमास माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवी नामदे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. योग प्रशिक्षक दिगंबर उचगावकर आणि अनुजा उचगावकर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत विविध आसने आणि प्राणायामांचे मार्गदर्शन केले.

यावेळी साधकांनी सूर्यनमस्कार, कंधरासन, मर्कटासन, द्विपाद उत्तानपादासन, भुजंगासन, तिर्यक भुजंगासन, शशांकासन, बद्धकोनासन, ताडासन, वीरासन आदी योगासनांचा सराव केला. तसेच कपालभाती, भ्रामरी, अनुलोम-विलोम, शीतली आणि शीतकारी प्राणायामही करण्यात आले.

योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.




















Join Our Whatsapp Group