पिंपळे सौदागर (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे रविवारी (दि.२१) सकाळी सामूहिक योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी रहाटणी-पिंपळे सौदागर आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका कुंदा भिसे, नगरसेविका अनिता काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवना सहकारी बँकेचे संचालक जयनाथ काटे, संदेश काटे, संजय भिसे, संदीप काटे, दिनेश काटे, मनोज ब्राम्हणकर तसेच द आर्ट ऑफ लिव्हिंगचे अमित मगर, राजेश पाटील, सुप्रिया पाटील, प्रविण कुंजीर, बाळकृष्ण परघळे, दीपक गांगुर्डे, समीर देवरे, विजय पाटील, शितल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते द आर्ट ऑफ लिव्हिंगचे सत्यजित भैया यांचे मार्गदर्शन. भजनाच्या चैतन्यमय ठेक्यावर त्यांनी उपस्थितांकडून विविध योगासने व प्राणायाम करून घेतले. संगीत आणि योग यांचा सुंदर संगम अनुभवताना नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. योगाचे महत्त्व, योग्य पद्धती आणि दैनंदिन जीवनातील त्याची उपयुक्तता याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अवघ्या पाच वर्षांच्या सई थेऊरकर हिने व्यासपीठावरून कठीण योगासने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच प्रीती मानकर यांनी संगीताच्या तालावर ‘टाळी योगा’ या नाविन्यपूर्ण योगप्रकाराचे सादरीकरण करून कार्यक्रमात वेगळी रंगत आणली.

याप्रसंगी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारे एक शास्त्र आहे. आधुनिक जीवनशैलीत मानसिक शांतता आणि उत्तम आरोग्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे भारताची योग परंपरा आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे. प्रत्येक नागरिकाने ‘रोज योग, रोज आरोग्य’ हा संकल्प अंगीकारावा.”
या योग शिबिरात परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.




















Join Our Whatsapp Group