
नवी सांगवी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील पल्लवीताई महेश जगताप स्वयंरोजगार व महिला प्रशिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने महिला आणि युवतींना अध्यक्षा पल्लवीताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित महाभोंडला व फराळ स्तुत्य उपक्रम उत्साहात साजरा केला. येथील रामकृष्ण मंगल कार्यालयमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाभोंडला शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ यावेळेत रामकृष्ण मंगल कार्यालय येथे पारंपरिक ढंगात व उत्साहात पार पडला. देवीची आरती करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर मान्यवर पाहुण्यांचे स्वागत आणि हत्ती पूजन अशा विधींनी वातावरण मंगलमय झाले. पारंपरिकता जपत आधुनिक शिक्षणाशी नाळ जुळवून देणारी ही उपक्रमरचना विशेष ठरली. परिसरातील महिला, युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारतीय संस्कृतीतील परंपरेचा वारसा जपत, निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी ‘महाभोंडला उत्सव’ आणि फराळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सातशेहून अधिक महिलांच्या उपस्थितीत पारंपरिक पोशाखात गोलाकार फेर धरून गाणी म्हणत भोंडल्याची रंगत वाढवली. स्त्रियांच्या सहभागाने रंगलेल्या या सोहळ्यात गाणी, फुगड्या, खेळ व निसर्गपूजनाचा उत्सवी माहोल अनुभवायला मिळाला.

महाभोंडल्यात पारंपरिक ओव्या, शेती व निसर्गाचे वर्णन करणारी गाणी, देवी-देवतांची स्तुती आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडवणारे गीतांचा समावेश होता. झिम्मा, फुगडी, एका हाताची व दोन्ही हातांची फुगडी अशा खेळांनी उत्सव अधिक रंगतदार झाला. ज्येष्ठ महिलांनी भोंडल्याशी संबंधित पारंपरिक गाणी म्हणत पुढील पिढीला संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश दिला. पारंपारिक गाणी, विद्यार्थिनींचे सामूहिक नृत्य, ढोल पथक, गरबा नृत्य, उखाणे व फुगडी स्पर्धा या गोष्टी या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या. पिढ्यानपिढ्या चालत आलेली भोंडल्याची परंपरा आजही महिलांना सामूहिकरीत्या एकत्र आणते.

यावेळी महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून विविध गाणी गात, फुगड्या खेळत परंपरेचे दर्शन घडवले. निसर्गपूजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यामुळे महाभोंडला उत्सव केवळ एक धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता सामाजिक ऐक्याचा प्रतीक ठरला. महाभोंडल्याचा उत्सव हा स्त्रियांच्या आनंद सोहळ्यासोबतच समाजातील परस्पर संबंध दृढ करणारा उपक्रम आहे. सामूहिक गाण्यांमधून स्त्री-पुरुष समानता, ऐक्य आणि निसर्गाविषयीची कृतज्ञता अधोरेखित झाली. तरुणींनी केलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे परंपरेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार शंकरभाऊ जगताप व माजी आमदार अश्विनीताई जगताप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. आदि उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करून महाभोंडला हा उत्सव म्हणजे संस्कृतीचे संवर्धन, समाजातील ऐक्य वृद्धिंगत करणारा आणि निसर्गाशी आपले नाते दृढ करणारा अमूल्य ठेवा आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. या निमित्ताने महिलांना एकत्र येऊन सांस्कृतिक अभिव्यक्ती सादर करण्याची, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि परंपरा जपण्याची संधी मिळाली. त्यामुळे महाभोंडला उत्सव हा केवळ पारंपरिक विधी न ठरता सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून अधोरेखित झाला.

पल्लवीताई महेशदादा जगताप यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, महाभोंडला हा केवळ धार्मिक परंपरा नसून महिलांना एकत्र आणणारा आनंदाचा आणि सांस्कृतिक जपूनुकीचा उत्सव आहे. पारंपारिक प्रथा जपत त्याला आधुनिकतेची जोड देणे आणि पुढील पिढ्यांना ही परंपरा समजावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात असा पारंपारिक सोहळा आत्मिक शांती देऊन जातो तरुणाईला आपली संस्कृती प्रत्यक्ष अनुभवता येते व ही तरुण पिढी या परंपरेला पुढे घेऊन जातील अशी आशा मी व्यक्त करीत आहे. उपस्थित सर्वांनी परंपरा जपत पुढील पिढीकडे हा सांस्कृतिक वारसा पोहोचवण्याचा निर्धार मी याप्रसंगी व्यक्त करीत आहे.























Join Our Whatsapp Group