पिंपरी (Pclive7.com):- ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति युनिट ३५ पैसे ते ९५ पैसे अशी केलेली ‘सुलतानी’ वीज दरवाढ तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी आज बुधवार दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी भोसरी येथील महावितरण विभागीय कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

माजी नगरसेवक मारुती साहेबराव भापकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, वाढीव दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडणार असल्याची संतप्त भावना व्यक्त करण्यात आली. दरवाढीसोबतच वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, अपुरा कर्मचारी वर्ग आणि निकृष्ट सेवा यामुळे होणारे ग्राहकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हाल आंदोलकांनी मांडले. महावितरणने ऑक्टोबर महिन्यापासून लागू केलेली ही दरवाढ, १ ते १०० युनिटसाठी ३५ पैसे, १०१ ते ३०० युनिटसाठी ६५ पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ८५ पैसे आणि ५०१ युनिटपेक्षा जास्त वापरणाऱ्यांसाठी ९५ पैसे प्रति युनिट अशी आहे.

काळ्या फिती आणि काळे झेंडे दाखवून आंदोलकांनी या दरवाढीचा तीव्र निषेध केला. विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि ते सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, काँग्रेस पक्षाचे मनोज कांबळे, नरेंद्र बनसोडे, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रविण कदम, जिवन बोऱ्हाडे, धम्मराज साळवे, काशिनाथ जगताप (राष्ट्रवादी श.प.) अरुण पवार, काँग्रेसचे ज्ञानेश्वर मलशेट्टी, सालार शेख, शिवशंकर उबाळे, सुरेश भिसे, विष्णू बिरादार, रावसाहेब गंगाधरे, सोमनाथ शेळके, अनिल करंदीकर, आदेश लुकंड माधव नेरलेकर, काँग्रेसचे बी बी शिंदे, विशाल भालेराव, दीपक भंडारी, सोनवणे प्रताप, सतीश भोसले, आणि देवराम गोरख, हिरामण खवळे, सर्जेराव पाटील, नारायण बिरादार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group