पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत कार्यक्रम उद्या मंगळवार दि.११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सदर सोडत त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे.

महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडतीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज प्राधिकृत अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली रंगीत तालीम देखील पार पडली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, स्मार्ट सिटीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांच्यासह महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पोलीस निरीक्षक अंकुश बांगर तसेच निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार यांनी आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने केलेल्या तयारीची संपूर्ण माहिती घेतली. तसेच आरक्षण सोडतीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी पोलीस प्रशासन व महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.

शासकीय वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी..
११ नोव्हेंबर २०२५ रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरात शासकीय वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार आहे. तरी आरक्षण सोडतीच्या ठिकाणी खासगी वाहने आणू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
चार टप्प्यात पार पडणार आरक्षण सोडत..
१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागा वाटप करून नियम २०२५ नुसार प्रथम अनुसूचित जाती महिला आरक्षण सोडत काढणे.
२) अनुसूचित जमाती महिला आरक्षण सोडत काढणे.
३) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची सोडत काढणे व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरीता वाटप करणे. नियमानुसार कारवाई करणे.
४) सर्व साधारण महिलांकरीता जागा नेमून देणे.
























Join Our Whatsapp Group