
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, तो कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबरला अचानक बदलला. त्यामध्ये १४ नोव्हेंबरला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे नमूद होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.१३) परत मतदार याद्यांच्या प्रसिद्धीचे वेळापत्रक बदलले असून, आता प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांसह माजी नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मतदार यादी सुधारणा करा, दुबार व मृत मतदारांची नावे वगळा. त्यानंतरच महापालिका निवडणुका घ्या, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्या मागणीची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे.

त्यावर सूचना व हरकती २७ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे सात दिवस स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी ५ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.























Join Our Whatsapp Group