पिंपरी (Pclive7.com):- बंद असलेल्या घरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ घ्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या ताब्यातून जवळपास सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. धनंजय हरीश काळे (वय २९) वर्ष असे घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याचं नाव आहे.

धनंजय काळे हा चोरीचे दागिने विकण्यासाठी निगडी प्राधिकरण परिसरात येणार आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत धनंजय काळे याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याला चोरीच्या गुन्ह्यात मदत करणारे त्याचे साथीदार चंद्रकांत अनंता माने आणि सुनील मल्हारी तलवारे याचा शोध पोलीस घेत आहेत.

या तिन्ही आरोपींनी मिळून पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी आणि निगडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहेत. तसेच या तिन्ही आरोपींनी आतापर्यंत पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात जवळपास ५० ते ६० चोरीचे गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, शिवानंद स्वामी, संतोष इंगळे, दिलीप चौधरी, शिवराम भोपे, देवा राऊत, दिपक तांदळे, विजय जानराव, केशव चेपटे, सोहेल चिखलकर यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group