तीन सर्व्हे झाले, आणखी दोन सर्व्हेमधून ठरणार उमेदवारी; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून ‘मायक्रो लेव्हल’ रणनिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने उमेदवार निवड प्रक्रिया अधिक काटेकोर आणि सर्व्हेआधारित केली असून इच्छुकांसाठी हीच खरी अग्निपरीक्षा ठरणार आहे. महानगरपालिकेत एकूण 128 जागा असून 2017 मध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चितीसाठी मायक्रो लेव्हल सर्व्हे केले जात आहेत.

भाजपाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. उमेदवारी ठरवताना “इलेक्टिव्ह मेरिट”म्हणजेच ‘‘निवडून येण्याची क्षमता’’ हा मुख्य निकष असेल, तसेच सर्व्हेच याचा आधार असेल, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

भाजपाने आतापर्यंत तीन सर्व्हे पूर्ण केले आहेत. पहिला सर्व्हे : भाजपा पक्ष व विद्यमान आमदारांच्या कामाचे मूल्यमापन, दुसरा सर्व्हे : इच्छुकांची नावे, तिसरा सर्व्हे : इच्छुकांच्या सक्रियतेचे मूल्यमापन असा करण्यात आला. आता चौथा आणि पाचवा सर्व्हे घेतल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणात ही सर्व प्रक्रिया सुरू आहे. याच अहवालावर अंतिम उमेदवारी निश्चित होणार आहे, असे समजले.

१४–१५ डिसेंबरला नागपूरमध्ये उमेदवारी निश्चित?
भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हेअहवालांचे परीक्षण झाल्यानंतर १४ किंवा १५ डिसेंबरला नागपूर येथे महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड भाजपा कोअर कमिटीची बैठक होईल. त्यामध्ये उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांना निवडणूक कामाला गती देण्याची सूचना देण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व्हे-केंद्रित रणनीती, स्वबळाचा निर्धार आणि प्रभागनिहाय काटेकोर नियोजन यामुळे इच्छुकांमध्ये चाचपणी सुरू असून आगामी आठवडा राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहे.






















Join Our Whatsapp Group