पिंपरी (Pclive7.com):- महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने मोठा आणि निर्णायक डाव टाकला आहे. शहरातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल आझम पानसरे यांनी वडिलांच्या आशीर्वाद घेत आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शहरात भाजपकडून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाचे प्रयत्न सुरू असताना, निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आझम पानसरे यांना पिंपरी–चिंचवडमध्ये आजही मोठा जनाधार असून, विशेषतः अल्पसंख्याक समाज आणि झोपडीपट्टी विभागातील मतदारांवर पानसरे गटाचा प्रभावी दबदबा कायम आणि निर्णायक आहे. त्यांच्या गटाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक प्रश्नांवरील पकड सर्वश्रुत आहे.

निहाल आझम पानसरे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय फायदा होणार आहे. या प्रभागांमध्ये पानसरे गटाची मते निर्णायक ठरण्याची दाट शक्यता असून, येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

या घडामोडीकडे अजित पवारांचा पिंपरी–चिंचवडमधील ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून पाहिले जात आहे. सेक्युलर मतांची विभागणी टाकण्यासाठी आणि त्यांचा पक्षाला फायदा करण्यासाठी, संघटन मजबूत करणे, सामाजिक समिकरणे आपल्या बाजूने वळवणे आणि थेट मतदारांपर्यंत पोहोचणारे नेतृत्व जोडणे, या तिन्ही बाबी राष्ट्रवादीने एका निर्णयातून साध्य केल्याचे बोलले जात आहे.






















Join Our Whatsapp Group