पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. रविवारी (दि. २८) तळवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडताना त्यांनी ही घोषणा करत पिंपरी-चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्यावर शिक्कामोर्तब केले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुका थोड्या उशिरा झाल्या असल्या तरी कार्यकर्त्याला जपणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच मी स्वतः आज इथे आलो आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्रात स्वतःचा लौकिक निर्माण केला. पूर्वी या शहरात उद्योग होते, मात्र सुखसुविधा कमी होत्या. काम इथे आणि राहायला पुण्यात, असं चित्र होतं. मी खासदार झाल्यानंतर हे चित्र बदललं.
मला कामाची आवड आहे, मी कामाचा माणूस आहे. मागील वेळी दिलेला शब्द पाळला असून या प्रभागात आमचा चार सदस्यांचा पॅनल निवडून आला. आज पिंपरी-चिंचवड शहरात तीन आमदार आहेत, तर २०२९ मध्ये येथे पाच आमदार असतील, असा ठाम दावा त्यांनी केला. तसेच राज्यात २८८ आमदारांपैकी ९६ महिला आमदार असतील, कारण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका एकेकाळी जगातील श्रीमंत महापालिकांपैकी होती. पुर्वी मी सांगेल ते महापौर, आमदार, स्थायी समिती अध्यक्ष ठरत होते, तरीही महापालिका कधीही कर्जबाजारी झाली नाही. १९९२ ते २०१७ या कालावधीत माझी सत्ता महापालिकेवर होती, पण माझ्यावर एकही आरोप झाला नाही, असा दावा अजित पवार यांनी केला.
आज मात्र टेंडर रिंग, ठराविक लोकांना कामे देणे, भ्रष्टाचार सुरू असल्याची टीका त्यांनी केली. राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी राज्यालाही आणि जिल्ह्यालाही निधी देत आहे. शहराची लोकसंख्या वाढली असून कोणाचीही दहशत किंवा गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आळंदी आणि देहू तीर्थक्षेत्राचा अपेक्षित विकास झाला नाही, कारण दूरदृष्टी असलेले नेतृत्व नव्हते, अशी टीकाही त्यांनी केली. शहरात बंद पाइपलाइन आणण्यासाठी महापालिकेत सत्ता हवी आहे. मी कधीही या शहराकडे दुर्लक्ष केलं नाही, शहरातील बहुतांश कामे माझ्याच काळात झाली, असे त्यांनी सांगितले.

शहरातील लाडक्या बहिणींना सुरक्षित वाटले पाहिजे, त्यांना संरक्षण हवे असून पोलिस यंत्रणेने अधिक लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज फोडाफोडीचे राजकारण सुरू असले तरी मी कधीही तसे राजकारण केले नाही, असे सांगत जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे निवडून आल्याचा उल्लेख त्यांनी केला.
मधल्या काळात विकासाची कामे थांबली, टेंडर रिंग झाली, ठराविक लोकांनाच कामे देण्यात आली. झालेला भ्रष्टाचार थांबवायचा आहे. तळवडे परिसरात बायो-डायव्हर्सिटी प्रकल्प राबवला जात आहे. ज्यांनी शहराला कर्जात ढकलले, त्यांना बाजूला करायचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.
दोन दिवसांत सर्व जागांचे वाटप होईल, थोडा संयम ठेवा, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की माझी केंद्रातही ओळख आहे. माझी टीम निवडून द्या, पिंपरी-चिंचवडमधील दहशत मोडून काढायची आहे. पुढील काळात आंध्रा धरणाचे पाणी कमी पडल्यास वरच्या टाटा धरणातून पाणी आणावे लागेल. त्यासाठी गोडीगुलाबीने नाही, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा ठाम संदेश देत अजित पवार यांनी भाषणाचा समारोप केला.






















Join Our Whatsapp Group