पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रचारात आघाडी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल होण्याआधीच आज (दि.२८) अजित पवार यांनी आपल्या संभाव्य उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

प्रभाग क्रमांक १२ रुपीनगर, तळवडे, ज्योतिबा नगर, गणेशनगर परिसरातून शरद भालेकर, पंकज भालेकर, चारुलता सोनवणे आणि सीमा भालेकर या संभाव्य उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

तसेच प्रभाग क्रमांक १ चिखली येथील म्हेत्रेवस्ती, ताम्हणेवस्ती, मोरेवस्ती परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येणारे विकास साने, यश साने, साधना नेताजी काशीद आणि संगीता ताम्हाणे या चार उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज अजित पवार यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. अजित पवार यांचे स्वागत भलामोठा हार घालून करण्यात आले. ‘लाडक्या दादा’च्या स्वागतासाठी त्यांच्या लाडक्या बहिणीही ओवाळणीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडून अजित पवारांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत थेट आघाडी घेतल्याची चर्चा आता पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.






















Join Our Whatsapp Group