रहाटणी (Pclive7.com):- पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी निर्णायक राजकीय डाव टाकत माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या पत्नी अनिता कैलास थोपटे यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना घेतलेला हा निर्णय केवळ उमेदवारीपुरता मर्यादित नसून, प्रभागातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रहाटणी–काळेवाडी परिसराच्या राजकारणात कैलास थोपटे यांचे नाव स्वतंत्र वलय असलेले मानले जाते. सलग दहा वर्षे त्यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले असून, विकासाभिमुख कामे, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि नागरिकांशी थेट संवाद ही त्यांच्या कारकिर्दीची ओळख राहिली आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या लाटेत त्यांचा निसटता पराभव झाला असला, तरीही त्यांच्या कार्याचा ठसा आणि मतदारांमधील विश्वास आजही कायम असल्याचे दिसून येते.

याच पार्श्वभूमीवर महिला उमेदवार पुढे करत राष्ट्रवादीने चाणाक्ष राजकीय चाल खेळल्याचे मानले जात आहे. एकीकडे नवा चेहरा तर दुसरीकडे कैलास थोपटे यांचा प्रदीर्घ अनुभव, मजबूत संघटनात्मक नेटवर्क आणि जमिनीवरची पकड—या सर्व बाबींच्या एकत्रित परिणामामुळे या उमेदवारीला वेगळी धार मिळाली आहे.

महिला उमेदवाराच्या माध्यमातून महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी, सहानुभूतीचा घटक आणि थोपटे यांची विश्वासार्हता यांचा मिलाफ झाल्यास हे ‘महिला कार्ड’ राष्ट्रवादीच्या पारड्यात झुकू शकते, असे संकेत राजकीय विश्लेषक देत आहेत. तसेच विरोधकांना तयारीसाठी कमी वेळ मिळाल्याने ही रणनीती अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत, प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादीने टाकलेला हा धाडसी डाव निवडणुकीचे चित्र बदलणारा ठरेल का, आणि सत्ता समीकरणे कुणाच्या बाजूने वळतील, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.






















Join Our Whatsapp Group