पिंपरी (Pclive7.com):- अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ०४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ५५ किलो ५७५ ग्रॅम गांजा, ०५ मोबाईल फोन, तसेच दोन स्कोडा कार असा सुमारे ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार आणि सह पोलीस आयुक्त, उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ डिसेंबर रोजी पिंपरी पोलिस स्टेशन हद्दीतील सिलाई स्टोअरजवळ सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली.

यावेळी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पुरुष व महिलांचा समावेश असून ते पुणे परिसरातील विविध भागातील रहिवासी आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या गांजासह दोन सोनेरी रंगाच्या स्कोडा गाड्या, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपींच्या माध्यमातून आंतरराज्य गांजा तस्करीचे रॅकेट उघडकीस आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलता धोरण राबविण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांचे कार्यालय अथवा ८६००००२३२० या क्रमांकावर संपर्क साधावा. माहीती देणा-या नागरिकांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे नागरिकाना आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, स्वप्निल चव्हाण, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, गणेश करपे, ज्ञानेश्वर मुळे, शिल्पा कांबळे, गोविंद डोके, चिंतामण सुपे, रणधीर माने, निखिल वर्षे, कपिलेश इगवे, संतोष सपकाळ, यांच्या पथकाने केली असुन पोलीस अंमलदार नागेश माळी, सुभाष गुरव यांनी तांत्रिक विश्लेषणसाठी मदत केली आहे.






















Join Our Whatsapp Group