पिंपरी (Pclive7.com):- दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणावर हल्ला केल्याची घटना दापोडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रांशू शाम बारमेडा (वय २५, रा. कृष्णानगर लेन नं. २, सांगवी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ मार्च रोजी दापोडी येथील कुक्कडवाला मनी फॅक्टरींग दुकानासमोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भिसे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), राम अशोक कांबळे (वय २४), संकेत भालचंद्र वाघमारे (वय २०) आणि वेदांत मोरे (वय २४, सर्व रा. दापोडी सिद्धार्थनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी दुकानात असताना आरोपी तेथे आले आणि दारू पिण्यासाठी एक हजार रुपये देण्याची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली.

यावेळी एकाने फिर्यादीच्या नाकावर ठोसा मारल्याने त्याच्या नाकातून रक्त आले आणि फ्रॅक्चर झाले. तसेच इतर आरोपींनी हाताने मारहाण करून दुखापत केली आहे. या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.



















Join Our Whatsapp Group