पिंपरी (Pclive7.com):- पुण्यातील Indus Business School (IIEBM) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रणभूमी २०२६’ या भव्य आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ झाला. ३५ पेक्षा अधिक महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असून कॅम्पसवर उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

१० मार्च रोजी IIEBM कॅम्पसमध्ये पारंपरिक नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विविध महाविद्यालयांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रंगीबेरंगी जर्सी आणि पोस्टरमुळे वातावरणात ऊर्जा संचारली.
११ मार्च रोजी चांदखेड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब येथे मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. नारळ फोडून स्पर्धेची पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘रणभूमी’ ध्वजाचे अनावरण, चॅम्पियनशिप ट्रॉफीचे अनावरण तसेच आकाशात फुगे सोडून स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या प्रसंगी IIEBMचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर जयसिंग मारवाह यांनी सर्व खेळाडूंना प्रामाणिकपणा, धैर्य आणि क्रीडाभावनेने स्पर्धा करण्याची शपथ दिली. “रणभूमी ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून भविष्यातील नेतृत्व घडवणारे व्यासपीठ आहे. येथे धाडस, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा होते,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला चांदखेडच्या सरपंच मीना माळी, माजी पोलीस पाटील दत्तात्रय माळी, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष योगेश शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच प्रायोजक संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
स्पर्धेत क्रिकेट, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ तसेच ४×१०० मीटर रिलेसारख्या आकर्षक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी एकूण दीड लाख रुपयांहून अधिक बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक संघाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेल्या किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.
क्रीडा स्पर्धांसोबतच IIEBM कॅम्पसमध्ये डीजे शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी हा क्रीडा महोत्सव उत्साहाचा पर्व ठरत आहे. ‘रणभूमी २०२६’ मुळे पुण्यातील महाविद्यालयीन क्रीडा क्षेत्रात नवा जोश निर्माण झाला आहे.






















Join Our Whatsapp Group