पिंपरी (Pclive7.com):- १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा मुहर्त साधत पिंपरी चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते नवीन आयुक्तालयात ध्वजारोहण करून आयुक्तालयाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.
ध्वजारोहण वेळी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेवक विलास मडेगिरी व सामाजिक कार्यकर्ते, पोलीस मित्र, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पिंपरी चिंचवड मध्ये वाढत्या औद्योगीकरण व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड शहरात नवीन आयुक्तालय सुरू करण्याचा आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. आयुक्तालय सुरू करण्याची घाई झाली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बापट म्हणाले, कुठल्याही प्रकारची घाई झालेली नाही. आपण घर घेतल्यावर लगेच सर्व वस्तू विकत घेत नाही. यामुळे आयुक्तालय सुरू झाले आहे. हळू हळू आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकरच कामकाज देखील सुरुळीतपणे सुरू होईल.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही फोनं फ्रेंड ही संकल्पना राबवणार असून या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठलीही घटना घडल्यास अथवा नागरीकांना पोलिसांची मदत लागल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधल्यास अवघ्या पाच मिनटात पोलीस नागरिकांपर्यंत पोहचेल यामुळे त्यांना तत्काळ पोलीसांची मदत मिळेल. यासाठी आयुक्तालयाचा लवकरच कंट्रोल क्रमांक जाहीर करण्यात येईल.
ध्वजारोहण करून आयुक्तालय आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. आयुक्तालयासाठी मिळालेल्या प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे नूतनीकरणाचे काम वेगात सुरु आहे. संपूर्ण काम होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. आयुक्तालयाची सर्व सूत्रे ऑटो क्लस्टर मधून हलणार आहेत.





















Join Our Whatsapp Group