पिंपरी (Pclive7.com):- पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ‘फजली आंबा’ पिंपरीच्या मार्केटमध्ये दाखल झाला आहे. राज्यात ‘फजली आंबा’ ऑगस्टनंतरच दाखल होतो. त्यामुळे आंब्याची आवक झाली असून ठराविक ग्राहकांची मागणी या आंब्याला होत आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आंबा बाजारात विक्रीसाठी राहण्याची शक्यता असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.
भारतीय आंब्याच्या मोसममध्ये सर्वांत अखेर दोन जातीचे आंबे येतात. त्यामध्ये डिंगा आणि चौसा यांचा क्रमांक लागतो. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत हा आंबा बाजारात उपलब्ध असतो. त्यामुळे या आंब्याची आवड असणारे नागरिक त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाळ्यातही आंब्याची आवड असणाऱ्यांना एका आंब्याची वाट असते, त्यामध्ये फजली आंब्याचा क्रमांक लागतो. ऐन पावसाळ्यामध्ये सर्व आंब्याचा हंगाम संपल्यांनतर बाजारात फजली आंबा दाखल होतो. यामुळे ज्यांना हा आंबा पावसाळ्यात मिळतो हे माहिती असते ते नागरिक त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये फजली आंब्याच्या मोठ्या बाग असून येथेच त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येत असल्याची माहिती फळ विक्रेता मनोज मुलानी यांनी दिली.
फजली आंब्याचे साधारण त्याच्या आकारानुसार चार प्रकार पडतात. त्यानुसार त्यांची ‘पॅकींग’ करून ते विक्रीसाठी पाठवण्यात येतात. यामध्ये एक नंबरच्या प्रकारात त्याचे वजन अंदाजे दोन किलोच्यावर असते. त्याचा आकाराच एवढा असतो की त्याला पाहताच क्षणी कलिंगडाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या क्रमांकाच्या प्रकारामध्ये त्याचे वजन अंदाजे दीड किलोच्या जवळपास असते. तर क्रमांक तीनचा आंबा सहाशे ग्रॅमच्या जवळपास असतो. या क्रमांक तीनच्या आंब्याची पाकिस्तानातून आवक होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. क्रमांक चारचा आंब्याचा आकार लहान असल्याने त्याची ‘पॅकींग’ होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील काही व्यापारी पाकिस्तानहून फजली आंब्याची खरेदी करतात. आंबा मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याच्या मागणीनुसार इतर शहरात तो पाठवण्यात येतो. फजली आंब्याचा मोसम सर्वात शेवटचा असतो. त्यामुळे ज्यांनी या आंब्याची चव चाखलेली असते ते आवर्जून त्याची मागणी करतात आणि फजली आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या त्याचे भाव ३५० ते ४०० रूपये किलो आहेत. फजली आंबा चवीला एकदम गोड असून त्याचा गर लालसर, केसरी रंगाचा असतो. एकदा फजली आंबा चाखल्यानंतर दुसरा आंबा खायला आवडणार नसल्याचा दावा विक्रेते करत आहेत.






















Join Our Whatsapp Group