पिंपरी (Pclive7.com):- शिक्षकांचे समाजामध्ये आदराचे स्थान आहे. शिक्षण हा व्यवसाय नसून सुसंस्कृत ज्ञानसंपादन करणारा पेशा आहे. असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश बापट यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कै.अंकुशराव लांडगे, नाट्यगृह भोसरी येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रविण अष्टीकर, शिक्षण समिती सभापती प्रा.सोनाली गव्हाणे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, अनुराधा गोरखे, शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, शिक्षण समिती सदस्य शारद सोनवणे, सुवर्णा बुर्डे, संगिता भोंडवे, विनया तापकीर, उषा काळे, राजू बनसोडे, अश्विनी चिंचवडे, नगरसदस्य नामदेव ढाके, संतोष लोंढे, सागर गवळी, बाबू नायर, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, निर्मला गायकवाड, अश्विनी बोबडे, रेखा दर्शले, माजी शिक्षण समिती सभापती नाना शिवले, स्वीकृत सदस्य सागर हिंगणे, दिनेश यादव, संतोष मोरे, यासह अमोल थोरात, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी पराग मुंडे, प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री गिरिश बापट म्हणाले की, शिक्षणाने माणूस ज्ञान संपादन करतो, व ज्ञानाने माणूस सुसंस्कृत होतो. म्हणून तर भारतीय संस्कृती आजही टिकून आहे. शिक्षक हा माणूस घडवतो, माणसाने कोणत्याही क्षेत्रात कितीही प्रगती केली असली तरीही प्रत्येक प्रगत माणसाला शिक्षकांच्या हाताखालूनच जावे लागते. शिक्षक सहसा पुढारी होत नाही परंतु तो अनेक पुढारी घडवतो. शिक्षक हा गुणवंतच असतो समाजाच्या वेगळ्या शिफारसीची गरज नसते. शिक्षणासाठी सरकार जास्तीत जास्त निधी खर्च करते. असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे सर्व सामान्य कुटुंबातील असतात. या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेंचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना आद्ययावत सोय सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेंचा शैक्षणिक दर्जा वाढल्यास महापालिकेच्या नावलौकिकात भर पडणार आहे. आपल्या शहराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात गौरविले पाहिजे. यासाठी शिक्षण समिती सभापतीसह सर्व शिक्षण समिती सदस्य व मुख्यध्यापक, शिक्षक व प्रशासन यांनी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, सर्वच शिक्षक हे गुणवान असतात, त्यामुळे समाजात सुसंकृत व चांगला समाज घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्याच प्रमाणे पहिले गुरू हे आई वडील असतात समाजला बरोबर घेऊन जाण्याचे काम शिक्षक करतात. असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल व शाळांची पटसंख्या कशी वाढेल यासाठी सर्व शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.सोनाली गव्हाणे यांनी प्रास्तविक पर मनोगत व्यक्त केले.
महापालिका व खाजगी शाळेतील ६९ गुणवंत शिक्षक व शाळेंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार अविनाश वाळुंज यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group