पिंपरी (Pclive7.com):- १५ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन होऊन महिना उलटला तरी पोलीस आयुक्तलयाचे कामकाज अद्याप सुरळीत झालेले नाही. पोलीसांना काम करताना साधनसामुग्रीचा तुटवडा दिसून येतो. शिवसेनेचे रहाटणी-काळेवाडी विभागप्रमुख युवराज दाखले यांनी आयुक्तालयासाठी आवश्यक साधनसामुग्री व निधी तातडीने पुरवावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
युवराज दाखले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण यामुळे लोकप्रतिनिधी व जनतेच्या वतीने शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारत्मक विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु उद्घाटन होऊन महिना उलटला तरी पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरळीत झालेले नाही. पोलीस आयुक्तलयात हिंजवडी,वाकड, सांगवी, चिंचवड, भोसरी, पिंपरी, निगडी, तळेगाव, देहूरोड, चाकण, दिघी, भोसरी, एमआयडीसी या सर्व पोलीस स्टेशनचा समावेश करण्यात आला. एवढ्या मोठ्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर आहे. त्यासाठी पोलीसांना पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. सध्या अनेक वरिष्ठ अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना परिसरात गस्त घालण्यासाठी तसेच दैनंदिन कामकाजासाठी वाहनांचा तुटवडा भासत आहे. कारण नवीन आयुक्तलयात वाहनांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा वाहना अभावी कसरत करावी लागत आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडल्यास वेळप्रसंगी खासगी गाडीची व्यवस्था करून जावे लागत आहे. तसेच एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने यासाठी येणार खर्च हा मोठ्याप्रमांवर येत आहे. परंतु तो खर्चही वेळेवर मिळत नसल्यचे पोलीसांचे म्हणणे आहे.
आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांसाठी केबिन व आवश्यक यंत्रणा झाल्याशिवाय काम सुरळीत होणार नाही. आज आपण डिजिटल इंडियाच्या वातावरणात असताना सर्व पोलीस स्टेशनमध्ये संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, शिक्के, वॉकीटॉकी, गस्तीसाठी वाहने, तसेच आवश्यक साधनांची मोठ्या प्रमाणवर गरज आहे. तसा प्रस्ताव पिंपरी पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस महासंचालक कार्यालयास व राज्यसरकाला पाठवण्यात आला आहे. परंतु संबंधित प्रशासनकडून दिरंगाई होत असल्याचे दिसत आहे.
या साधनसामुग्री शिवाय कामकाज चालविणे पोलीसांना शक्य होणार नाही. त्यामुळे पिंपरी पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक साधनसामुग्री तातडीने पुरवण्यात यावी. याकामी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, व पालकमंत्री गिरीश बापट दिले आहे.






















Join Our Whatsapp Group