पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील साईनाथनगर परिसरात कचरा संकलनासाठी आलेल्या डंपरच्या धडकेत चिरडून पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 14) दुपारी घडली. या घटनेनंतर वाहन चालकास वाहनासह ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 14 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी सुमारे 12.10 वाजण्याच्या सुमारास औदुंबर सोसायटीसमोर, साईनाथनगर, निगडी येथे महिंद्रा सुप्रो कचरा संकलन वाहन (क्र. MH-14-HG-7123) कचरा संकलनासाठी आले होते. यावेळी वाहनाची रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या दुचाकीला धडक बसली. धडकेमुळे दुचाकीचा आघात कु. संस्कृती भागवत बिरादार (वय 5 वर्षे, रा. औदुंबर सोसायटी, यमुनानगर, निगडी) हिला लागला. त्यामुळे ती वाहनाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तातडीने तिला उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.

अपघातानंतर महिंद्रा सुप्रो वाहन व त्याचा चालक राहुल प्रल्हाद चव्हाण (वय 28 वर्षे, रा. साने चौक, चिखली) तसेच त्याच्यासोबत असलेला राजू कुमार गायकवाड (वय 38 वर्षे, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालक व संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे साईनाथनगर व यमुनानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


















Join Our Whatsapp Group