पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘गणेशोत्सव स्नेहयात्रा – २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “गणरायाला वंदन, मंडळांशी संवाद, कार्याचा सन्मान” या संकल्पनेतून शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांशी संवाद साधला जाणार आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसह समाजातील सर्व घटक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. याच पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न आणि सकारात्मक उपक्रम जाणून घेण्यासाठी काँग्रेसने हा उपक्रम हाती घेतला आहे.
दि. १५ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहयात्रेदरम्यान शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे दहा मिनिटांचा संवाद साधला जाणार आहे. यामध्ये परिसरातील प्रमुख समस्या, मंडळांचे सामाजिक उपक्रम, युवकांचा सन्मान, भविष्यातील समाजोपयोगी उपक्रम तसेच विविध सामाजिक समस्यांबाबतची मते, कारणे आणि उपाय याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान गणरायाचे दर्शन घेऊन मंडळांच्या देखाव्याची माहिती जाणून घेतली जाणार असून मंडळांचा सन्मानही केला जाणार आहे. तसेच युवकांची मते, परिसरातील अडचणी, सामाजिक प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना याबाबत थेट संवाद साधून सूचना संकलित करण्यात येणार आहेत.
याबाबत माहिती देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, “गणेश मंडळे ही नव्या नेतृत्वाची पहिली शाळा असतात. त्यामुळे मंडळांमधील तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नव्या नेतृत्वाशी संवाद साधून त्यांच्या सूचना, अपेक्षा आणि समाजासाठीचे संकल्प जाणून घेणे हा या स्नेहयात्रेचा प्रमुख उद्देश आहे.”


















Join Our Whatsapp Group