पिंपरी (Pclive7.com):- कायद्याचे शिक्षण पूर्ण करून न्यायालयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण महिला वकिलाचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला. शुक्रवारी संध्याकाळी कोर्टाचे कामकाज आटोपून घरी परतत असताना भरधाव हायवाने दिलेल्या धडकेत साक्षी उर्फ डॉली दिनेश चौबे (वय २६, राहणार गुलमोहर नेक्सस, चऱ्होली पुणे) हिचा जागीच मृत्यू झाला. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असलेल्या साक्षीच्या जाण्याने चौबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दिघी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी शिवाजीनगर आणि पिंपरी न्यायालयात प्रॅक्टिस करत होती. शुक्रवारी संध्याकाळी ती तिच्या टीव्हीएस ज्युपिटर स्कुटरने (MH 14 MX 3336) दिघी भागातील गोडाऊन चौकाकडून अलंकापूरम चौकाकडे जात होती. आर. के. एल. शाळेसमोर मागून येणाऱ्या भरधोक हायवाने (MH 14 KA 8677) तिच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. धडकेमुळे साक्षी रस्त्यावर पडली आणि हायवाच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

फरार चालकाला पोलिसांकडून बेड्या..
अपघात झाल्यानंतर हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, दिघी पोलिसांनी तातडीने शोध घेत त्याला अटक केली. प्रमोद दिलीप चव्हाण (वय २९, रा. निरगुडी, हवेली; मूळ रा. यवतमाळ) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी साक्षीचे काका उमेश चौबे (वय ४४, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश मुसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




















Join Our Whatsapp Group