पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील उर्से टोल नाक्याजवळ मोठी कारवाई करत आंतरराज्यीय गुटखा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ७९ लाख ४६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राज्यात बंदी असलेल्या गुटख्याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव-परंदवडी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उर्से टोल नाक्याजवळ नाकाबंदी करण्यात आली होती.
नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी लाल रंगाचा आयशर टेम्पो (क्र. KA 52 C 6756) अडवून त्याची तपासणी केली. यावेळी चालकाने वाहनामध्ये सेंद्रिय खत असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची सखोल तपासणी केली असता खताच्या गोण्यांमागे मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूचा साठा लपवून ठेवलेला आढळून आला.

तपासणीमध्ये ४२ लाख ४३ हजार २०० रुपये किमतीचा रजनीगंधा गुटखा आणि १४ लाख ४० हजार रुपये किमतीची सुगंधी तुलसी तंबाखू जप्त करण्यात आली. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो आणि इतर साहित्य असा एकूण ७९ लाख ४६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी बंगळुरू येथील रहिवासी असलेला टेम्पो चालक अमजदउद्दीन ऐनुलहक चौधरी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा तस्करीच्या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शिरगाव-परंदवडी पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून पुढील तपास सुरू आहे.
ही मोठी कारवाई पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ, अशोक केंद्रे, प्रकाश पारखे, पोलीस हवालदार अमोल गोरे, किशोर गिरीगोसावी, सचिन काचोळे, पोलीस अंमलदार सुरेश परदेशी, प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड, शिवानंद चव्हाण, सागर कोळी, शुभम राजगुरे, रामेश्वर जाधवर यांच्या पथकाने केलेली आहे.



















Join Our Whatsapp Group